Crime Analysis : हायटेक 'एटीएम'फोडे पोलिसांच्या गळाला लागेना.!

0

 शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना 


वैजापूर शहरातील म्हसोबा चौकात असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल १६ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना १७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. दरम्यान या 'एटीएम'फोड्यांना पकडण्यासाठी वैजापूर पोलिसांसह छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक पोलिस अशी पथके रवाना झाली आहे. मात्र तीन दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप धागेदोरे मिळाले नाही. त्यामुळे या भामट्यांना पकडण्यासाठी आणखी किती दिवस लागणार? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.





   शहरातील छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या म्हसोबा चौकातील आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून चोरट्यांनी मोठ्या रकमेवर डल्ला मारला. याच रात्री वैजापूर येथील घटनेपूर्व कन्नड तालुक्यातील चापानेर येथेही एटीएम फोडून भामट्यांनी २२ लाख पळविले. या दोन्हीही घटनेतील साधर्म्य म्हणजे चोरी करताना गॅस कटरचा उपयोग करण्यात आला. दुसरे म्हणजे या दोन्हीही घटनांमध्ये साधारणतः अर्धा ते पाऊण तासांचा अंतर आहे. त्यामुळे हे भुरटे चोर नसून सराईत व हायटेक यंत्रणा असलेली ही टोळी असावी. असाही अंदाज पोलिसांचा आहे. 


वैजापूर येथील बॅक शाखेत दिवसा सुरक्षारक्षक असतो. रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसल्यामुळे चोरट्यांना डल्ला मारणे सोपे गेले. वैजापूर व चापानेर येथील चोरीच्या रकमेचा आकडा हा ३८ लाख आहे. दोन्ही घटना एकाच रात्री झाल्यामुळे एटीएम फोडणाऱ्या टोळीचे एकमेकांशी काही कनेक्शन आहे किंवा नाही. याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिस यंत्रणा भलेही या निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. परंतु तसे गृहीत धरून पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.


 विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी रोहित्र (डीपी) बंद करून बॅकेच्या परिसरातील पूर्णपणे विद्युतपुरवठा पुरवठा खंडित केला. त्यानंतर चोरट्यांनी बॅऺकेच्या मीटरचे वायर तसेच सायरनचे वायर तोडले नंतर एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला. एखाद्या चित्रपटात कथानक दाखवले जाते. अगदीं त्याच पद्धतीने हे  सर्व घडले. त्यामुळे चोरांनी बॅक व परिसरातील सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करूनच या प्रत्यक्ष कृती केली. पोलिस या परिसरातील अन्य सीसीटीव्ही  केॅमेरेच्या माध्यमातून संशयित आरोपींचे फुटेज शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांचे दोन पथके तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी  सांगितले.


 क्रेटा कार पोलिसांच्या रडारवर 


चोरटयानी चोरी करताना परिसरात केलेला अंधार तसेच कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारल्याने चोरट्यांचे चेहरे केमेऱ्यात स्पष्ट दिसत नाही. परंतु चोरीसाठी वापरण्यात आलेली पांढरी क्रेटा कार खंडाळ्याच्या दिशेने जाताना केमेऱ्यात कैद झाल्याचे दिसत आहे.त्यामुळे पोलिसांनी या कारवर विशेष फोकस करून जिल्ह्यासह  बाहेरील टोल नाक्यावरील कॅमेऱ्यांची तपासणी करून चोरटयाचा मागमूस घेत असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. दरम्यान पोलिसांना याबाबत अद्याप कोणताही क्लू लागला नसला तरी येत्या काही दिवसांत भामट्यांना गजाआड करूच. असा ठाम विश्वास पोलिस यंत्रणेला आहे.


वैजापूरसह  कन्नड तालुक्यात अशा दोन ठिकाणी चोरट्यांनी एटीएम फोडून ३८ लाखांची रोकड लंपास केली. चोरी करणारी टोळी ही परराज्यातील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दिशेनेही आमचा तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांच्या पथकामार्फत चोरट्यांचा शोध सुरू आहे. लवकरच ते पोलिसांच्या गळाला लागतील.


- पवनसिंह राजपूत, फौजदार तथा तपासी अधिकारी, वैजापूर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top