Deadly Attack | अन् 'त्याने' पोलिसावरच केला प्राणघातक हल्ला ; दांड्याने फोडले डोके

0

वैजापुरातील घटना ; हल्लेखोर अटकेत 



विनयभंगाच्या गुन्ह्यात पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला आरोपीने लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना २९ जानेवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील नवजीवन वसाहतीमध्ये घडली. या घटनेत पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यासह हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान प्राणघातक हल्ला करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हल्लेखोराविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.








किसन गवळी ( ४४) असे या जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे तर शुभम गोरख पवार (२८ रा. वैजापूर ) असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किसन गवळी हे वैजापूर पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. २८ जानेवारी रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिली होती. याप्रकरणी शुभम पवारसह त्याच्या अन्य एक साथीदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 




दरम्यान या गुन्ह्याच्या अनुषंगाने हवालदार किसन गवळी हे शहरातील नवजीवन काॅलनीमध्ये पीडित महिलेच्या घरी पंचनामा करण्यासाठी गेले होते. शुभम पवार हा तेथेच बाजूला राहतो. त्याला गवळी हे पंचनामा करण्यासाठी आल्याची भणक लागताच तो तेथे आला व 'मी आत्ताच मर्डर करून सुटून आलो. तुम्ही मला ओळखत नाही. तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तुम्ही पोलिस माझे काहीच वाकडे करू शकत नाही. आता मी पोलिसाच मर्डर करतो' असे म्हणून त्याने मागेपुढे न पाहता गवळी यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. 








आजूबाजूच्या महिलांसह नागरिकांनी त्याच्या तावडीतून गवळी यांची सुटका केली. या घटनेत गवळी यांच्या डोक्यासह हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना गंभीर अवस्थेत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार करण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. याप्रकरणी शुभम पवार याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.




गुंडाराज की पोलिसराज? 




एका खुनाच्या गुन्ह्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलिस कर्मचाऱ्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला. ही घटना पोलिस दलाच्या दृष्टीने अतिशय गंभीर म्हणावी लागेल. गुंडाची हल्ला करण्यापर्यंत मजल जाते. त्यामुळे शहरात गुंडाराज आहे की पोलिसराज? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गुन्हेगारावरांवरील पोलिसांची असलेली जरब संपली. असाही अर्थ यातून निघतो. त्यामुळे पोलिसांनी अशा उपद्रवी घटकांची झुंडशाही मोडीत काढणे गरजेचे आहे. अन्यथा अशी गुंडप्रवृत्ती वाढवून त्यांचे मनोबल वाढेल अन् पोलिसांचे मनोबल कमी झाल्याशिवाय राहणार नाही. 




सराईत गुन्हेगार 



दरम्यान आरोपी शुभम पवार याने दांड्याने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पकडून अटक केली आहे. शुभम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खूनाचा आरोप असून त्याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. तसेच २८ जानेवारी रोजी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top