नेत्यांकडून पुष्पहार अर्पण
वैजापूर शहरातून जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नगरपालिकेच्या जागेवर मंगळवारी रात्रीच्या सुमारास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. हा पुतळा नेमका कुणी बसविला. हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असले तरी बुधवारी सकाळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह धनगर समाजबांधवाची मोठी गर्दी होऊन त्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
शहरातील स्टेशन रस्त्यावरील बॅंक आॅफ महाराष्ट्र समोरील पालिकेच्या जागेवर मंगळवारी रात्रीच्या सुमारास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. बुधवारी सकाळी पुतळ्याची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. दिनेश परदेशी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व धनगर समाजबांधवांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीही याच जागेवर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता. परंतु प्रशासनाने तो पुतळा तेथून सन्मानाने हटविल्याने शहरात मोठे वादंग उठले होते. त्याच्या दोनच दिवसांनंतर त्याच ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसविण्यात आला.
पुतळ्यांचे शहर
दरम्यान गेल्या काही दिवसांत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर महापुरुषांचे पुतळे बसविण्यात आले. विशेषतः कोरोना काळात तालुक्यात पुतळे बसविण्याची अहमहमिका लागली होती. प्रत्येक समाजातील नागरिकांनी पुढाकार घेऊन महापुरुषांचे पुतळे बसविले. अनधिकृत पुतळे काढणे आवाक्याबाहेर झाल्याने प्रशासनानेही तिकडे डोळेझाक केली. त्यामुळे वैजापूर शहर हे पुतळ्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले.