सटाणा फाट्यावरील घटना
कोयत्याचा धाक दाखवून दोन भामट्यांनी दुचाकीस्वारास लुटल्याची घटना २७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील सटाणा फाट्यावर घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक वाल्मिक पठाडे हा तरुण तालुक्यातील माळीघोगरगाव येथील रहिवासी असून तो वैजापूर शहरातील एका मेडिकलवर कामाला आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे कामावरून सुट्टी झाल्यामुळे तो मोटारसायकलने (एम.एच. २० जी.एच. ४१२४ ) घराकडे जात होता.
रात्री साडेदहा वाजता तालुक्यातील सटाणा फाट्यावर तोंडाला मास्क लावलेले दोन अनोळखी इसम मोटारसायकलने पाठीमागून आले व त्यांनी विनायकला थांबविले. तो थांबताच त्याला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली व त्याची मोटरसायकल, मोबाईल संच व दोन चांदीच्या बांगड्या असा एकूण २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेला. विनायक पठाडे याने दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.