वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील पारेश्वर विद्यालयात मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेकडून देण्यात आलेल्या जलशुध्दीकरण सयंत्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी झांबड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागातील तरूण व्यसनाधीनतेकडे वळत आहे. त्यांना व्यसनाधीनतेपासून दूर करायचे असल्यास पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. व्यासपीठावर विभागीय व्यवस्थापक संपत मांडवे, सचिव अप्पासाहेब उगले, प्रकल्प अधिकारी ओंकार उगले, निरिक्षक विकास कांबळे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष तांबे उपस्थित होते.
विद्यालयात साडेचारशे विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी संस्थेने सीएसआर फंडातून साडेसहा लाख रूपये खर्चून शाळेच्या आवारात आरओ प्लांट उभारला. तसेच लवकरच 3 लक्ष रुपयाचे शौचालय बांधून देणार आहे. असे जाहीर केले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र शेळके व सचिव विजय कुमावत यांनी पाठपुरावा केला.
याप्रसंगी सरपंच आशा शेळके, उपसरपंच वर्षा जाधव, सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामभाऊ घोडके, ज्ञानेश्र्वर पगार, बंडू शेळके, नंदकिशोर जाधव, मनोज धनाड, मुख्याध्यापक बानाईतकर व श्री पारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. पी. कोठुळे यांनी तर सूत्रसंचालन सदाशिव मुलमुले यांनी केले. के. एस. जगदाळे यांनी आभार मानले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.