डिजिटल स्क्रीनव्दारे थेट प्रक्षेपण
अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामभक्तांचा अभुतपुर्व उत्साह बघायला मिळाला. ' जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय' अशा घोषणा देत भाविकांनी डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून अयोध्येतील राममंदिर सोहळा 'याची देही, याची डोळा'अनुभवला.
नागरिकांनी घरासमोर सडारांगोळीसह गुढी उभारुन प्रभू श्रीरामांच्या आगमनाचे स्वागत केले. शहरात भगवे झेंडे लावल्यामुळे शहर भगवेमय झाले होते. मंदिरात रामरक्षा, हनुमान चालीसा पठण, महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. येथील संकटमोचन हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. मंदिराच्या बाहेर डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांनी अयोध्येतील ऐतिहासिक सोहळा अनुभवला.
मोंढा मार्केट भागातील श्रीराम मंदिर विद्युत रोषणाईने अतिशय आकर्षकरित्या सजवण्यात आले होते. मंदिराचे विश्वस्त सुरेश तांबे, भगवान तांबे, डॉ. प्रिती भोपळे, सुप्रिया व्यवहारे, अनिता तांबे, किरण व्यवहारे, अशोक पवार, धोंडिरामसिंह राजपूत, प्रशांत कंगले, दशरथ बनकर, शैलेश चव्हाण, हेमंत संचेती, विष्णू जेजुरकर आदींच्या उपस्थितीत पुरोहित अशोक पैठणे यांनी विधिवत पुजा करुन श्रीरामाची आरती केली. प्रसादाचे वाटप, फटाक्यांची आतषबाजी करीत नागरिकांनी या सोहळ्याचे स्वागत केले.
सजीव देखावे प्रमुख आकर्षण
याशिवाय सायंकाळच्या सुमारास शहरातून मिरवणूक काढून सजीव देखाव्यांनी वैजापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. शहरासह तालुक्यातील राममंदिरे विद्युत रोषणाईने लख्ख झाली होती. तसेच रंगरंगोटी, स्वच्छता व आकर्षक सजावटीमुळे सर्वच मनोहारी वाटत होते.