नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर !
अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या राममंदिरावर विद्युत रोषणाई करण्याची संधी वैजापूरच्या तरुणाला मिळाली आहे. कुणाल सुभाष कासलीवाल असे या तरुणाचे नाव असून ते एका नामांकित कंपनीत दर्शनी भिंतीवर विद्युत रोषणाई करण्याच्या कामाचे राष्ट्रीय प्रमुख (नॅशनल हेड) म्हणून काम करतात.
कुणाल यांचे प्राथमिक शिक्षण वैजापूर येथील सेंट मोनिका शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी महाविद्यालयातून स्थापत्य क्षेत्रतील पदवी संपादन केली. मागील सात वर्षांपासून ते लायटींग अर्थात विद्युत रोषणाईचे काम करणाऱ्या कंपनीत नॅशनल हेड पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी कोलकत्ता येथील प्रसिद्ध हावडा ब्रिज, जी-२० परिषद या ठिकाणी सुंदर प्रकल्प राबवले आहेत.
आता कंपनीच्या माध्यमातून त्यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी विद्युत रोषणाईचे काम करण्याची संधी मिळाली असून मागील दोन महिन्यांपासून हे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. याचा वैजापूरकरांना निश्चितच अभिमान आहे. ही संधी मिळाल्याबद्दल समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
वडील सुभाष कासलीवाल हे वैजापूर मर्चंट को - ऑपरेटिव्ह बॅंकेचे माजी संचालक होते. अयोध्येत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, शिल्पा परदेशी, मर्चंट बॅंकेचे बाळासाहेब संचेती, साबेरखान आदींनी त्यांचे अभिनंदन केले.