डाॅक्टर, व्यावसायिकांना दाखविले मजूर
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या ( Mregs ) मजुरांच्या टाळुवरचे लोणी खाल्ल्याचा प्रकार तालुक्यातील वीरगाव - मुर्शदपूर ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे. ज्या मजुरांची नावे दाखविण्यात आली आहे. ती मात्र आश्चर्यचकित करणारी आहे. मेडिकल चालक, व्हेटरनरी डाॅक्टरला मजूर म्हणून दाखविण्यात आले आहे. बनावट सरपंच व ग्रामसेवकाने बनावट स्वाक्षऱ्या करून 'मग्रारोहयो'चे तब्बल ६४ लाख रुपये लाटले आहे. रक्कम हडपण्यासाठी सर्वच बनावट करण्यात आले. दस्तूरखुद्द विद्यमान सरपंचाने ही पोलखोल केली असून तशी तक्रारही गटविकास अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान या अर्थिक गैरव्यवहाराची तातडीने चौकशी व्हावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वीरगाव-मुर्शदपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा थोरात यांची ३ आॅगस्ट २०२३ रोजी निवड झाली होती. दरम्यान ग्रामपंचायतीचे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसाठी वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत स्वतंत्र खाते आहे. या खात्यावर व्यवहार करण्याचा अधिकार सरपंच व ग्रामसेवकांना आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून मनीषा थोरात तर एस. व्ही. शेटे (निरपळ) या ग्रामसेविका म्हणून काम पाहतात.
ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात काही तरी काळेबरे असल्याचा संशय मनीषा थोरात यांना आल्याने त्यांनी २४ जानेवारी रोजी ०१ नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीचा खाते उतारा (बँक स्टेटमेंट) काढला. या स्टेटमेंटमध्ये २७ डिसेंबर २०२३ पासून ग्रामपंचायतीच्या खात्यावरून कुणीतरी वेगवेगळ्या तारखेला एकूण ६३ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम बनावट सरपंच व ग्रामसेवकाने परस्पर काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे सरपंच व ग्रामसेवकांना चांगलाच धक्का बसला. दरम्यान बँकेतून पैसे काढण्यापूर्वी भामटयांनी खातेधारकांच्या सहीचे नमूने बदलण्यासाठी बँकेत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा ठराव दाखवून बनावट इतिवृत्त सादर करून बॅकेला सहीचे नमुने दिले. या प्रक्रियेनंतर बनावट सरपंच व ग्रामसेवकाने ती रक्कम परस्पर लाटली. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसे बघायला गेले तर याबाबत बँकेकडूनही हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते. याप्रकरणी ग्रामसेविका एस. व्ही. शेटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही हात वर केले आहे. परंतु भामटयांनी नाही जरी म्हटले तरी ही रक्कम २७ डिसेंबर २०२३ पासून वेळोवेळी बँक खात्यातून काढण्यास सुरवात केली होती. हा सर्व प्रकार २४ जानेवारी २०२४ रोजी संबंधितांच्या लक्षात आला. जवळपास महिनाभर या रकमेचा अपहार सुरू असताना याची साधी भणकसुद्धा संबंधितांना लागू नये म्हणजे ही आश्चर्यचकित करणारी बाब म्हणावी लागेल. त्यामुळे ग्रामसेविका काय करीत होत्या? बँकेतून ६४ लाख जाऊनही त्यांना भणक कशी लागली नाही? त्यांनी या अपहाराबाबत हात वर केले असले तरी त्यांचे उत्तरदायित्व नाकारता येईल का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. यासाठी त्याही तितक्याच जबाबदार असून त्यांची बेफिकीरी यातून सिद्ध होते.
ते दोघे कोण?
दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सही नमुन्याच्या अर्जावर दोघांच्या सह्या व छायाचित्रे आहेत. ३० आॅक्टोबर २०२३ रोजी हे सहीचे नमूने घेण्यात आले आहे. सकृतदर्शनी हे छायाचित्र माजी उपसरपंच व त्यांच्या मामाच्या मुलाचे आहे. वास्तविक पाहता अर्जावर जे छायाचित्र चिकटविण्यात आले आहे. ते बनावट सरपंच व ग्रामसेवक असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांनीच ही रक्कम हडपल्याची शक्यता आहे. त्यामुळे संशयाची सुई या दोघांभोवती फिरत आहे. चौकशीमध्ये या सर्वांचे बिंग फुटेलच.
ग्रामपंचायतीचे ६४ लाख रुपये बनावट सरपंच व ग्रामसेवकाने हडपले असून या अपहाराशी माझा संबंध नाही. मला बँकेचे मोबाईलवर मेसेज येत नव्हते. त्यामुळे अपहार कधी झाला. हे कळालेच नाही.
- एस. व्ही. शेटे, ग्रामसेविका, वीरगाव - मुर्शदपूर