वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार
वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एड्सबाधित ( Hiv Positive ) महिलेस परिचारीकेने पिटाळून लावल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रसूतीसाठी आणखी काही दिवस अवधी असल्याचे सांगितले खरे. परंतु वैजापूर येथून गेल्यानंतर काही तासांतच तिची छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात प्रसूती झाली. त्यापुढची शरमेची बाब म्हणजे संबंधित महिला ही एड्सग्रस्त असल्याचे रुग्णालयातील परिचारिकेने तिच्या नातेवाईकांकडे उघड केल्याने त्यांनीही तेथून काढता पाय घेतला. वास्तविक पाहता अशा रुग्णांची माहिती उघड करणे चूक तर आहेच. रुग्णालयातील परिचारिकेने त्यांच्याशी भेदभाव करून सापत्न वागणूक दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्रीच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील गंगथडी भागातील २४ वर्षीय एड्सग्रस्त महिलेला प्रसववेदना सुरू झाल्याने पतीने तिला थेट वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात गेल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी प्रसूतीसाठी आणखी काही दिवस अवधी असल्याचे सांगितले. त्यावर नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना दरडावून सांगितल्यानंतर येथील एका परिचारिकेने संबंधित महिला ही एड्सबाधित असल्याचे सोबतच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर त्या महिलेला रुग्णवाहिकेव्दारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच तिची नाॅर्मल प्रसूती झाली.
एकीकडे वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी काही दिवसांचा अवधी असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे घाटीत गेल्यानंतर महिलेची काही तासांतच प्रसूती होते. याचा अर्थ नेमका काय समजायचा? त्यामुळे वैजापूर उपजिल्हा रुग्णालय फक्त 'रेफर टू घाटीसाठीच' आहे काय? असा प्रश्न यानिमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही. त्याहीपेक्षा एखाद्या एड्सबाधित रुग्णाची माहिती उघड करणे कुठल्या कायद्यात बसते. दस्तुरखुद्द परिचारिकाच रुग्णाची माहिती उघड करून त्याची समाजात मान शरमेने खाली जाईल. असे कृत्य करीत असेल तर ही नक्कीच शरमेची बाब आहे. रुग्णालय प्रशासनाने अशा परिचारिकेविरुध्द कारवाई केली पाहिजे.
माझ्या पत्नीला प्रसववेदना सुरू झाल्यानंतर वैजापूर येथील रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांनी प्रसूतीसाठी आणखी अवधी असल्याचे सांगितले. रुग्णालयातच कार्यरत असलेल्या एका परिचारीकेने मी व माझी पत्नी एड्सबाधित असल्याचे नातेवाईकांना सांगितले. याशिवाय आम्हाला सापत्न वागणूक देण्यात आली.
- एड्सबाधित रुग्ण ( पती )
मी त्या महिलेला घाटीत जाण्यासाठी परिचारीकेसह रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. असं काही होईल. मला वाटत नाही. त्यांनी असे आरोप केले. मला तरी सांगता येणार नाही.
- सुधाकर मुंडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, वैजापूर
हा प्रकार आम्हालाही समजला. त्यामुळे आम्ही याबाबत रुग्णालय प्रशासनाशी बोललोही. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था एड्सबाधितांसाठि काम करते. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. परिचारिका जर एड्सबाधित रुग्णांची माहिती उघड करीत असेल तर ही शरमेची बाब म्हणावी लागेल.
- अप्पासाहेब उगले, सचिव, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, वैजापूर