SDM Order: बॅनरबाजी करणाऱ्यांना आवरा; 'चमकोगिरी'ला बसणार लगाम !

0

 कर्मचाऱ्यांना फलक काढण्याचे आदेश 


वैजापूर शहरामध्ये बेकायदेशीर डिजिटल फलकबाजांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. शहर विद्रूपीकरणाचा जणू ठेकाच या बॅनरबाजांनी घेतला की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.





शहराचे सौंदर्य अबाधित  राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण ज-हाड यांनी शहरातील मोक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर लावलेले डिजिटल फलक हटविण्याचे आदेश नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना दिले आहेत.  शहरामध्ये नगरपालिकेने प्रमुख मार्गावर सौंदर्य बेट विकसित करुन रस्त्यांचे  सौंदर्यीकरण केले आहे. मात्र या सौंदर्य बेटांच्या सौंदर्यालाच बाधा पोहोचेल अशा बॅनरबाजांनी त्यांच्या प्रसिध्दीसाठी उद्योग सुरू केले आहे.


 महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५ मधील कलम ५ नुसार विजेचे खांब, हायमास्ट, फूटपाथ, चौक, रस्ते, दुभाजक, वाहतूक बेटे, दूरध्वनी पोल, विद्युत डीपी, ट्रान्सफॉर्मर, सिग्नलचे खांब, दिशादर्शक फलकांवर जर पोस्टर, बॅनर, फलक लावले तर ते विद्रुपीकरणाच्या व्याख्येत मोडते. अशा ठिकाणी जर विद्रुपीकरण झाले तर ते विद्रुपीकरण करणारी व्यक्ती किंवा त्याच्या हस्तकांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यास तीन महिने कारावास व पाचशे ते तीन हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यात आहे.


 उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण ज-हाड यांनी बुधवारी दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी शहरात नगरपालिकेच्या परवानगीशिवाय लावलेले डिजिटल फलक काढण्याची मोहीम हाती घेतली. पथकाने विनापरवाना लावलेले होर्डिग्ज काढून टाकले. 


वैजापूर शहरात जाहिरात फलक लावण्या अगोदर नगरपालिकेची परवानगी संबंधितांना घ्यावी लागेल. सामाजिक अशांतता निर्माण करणारे फलक लावता येणार नाही. विनापरवानगी लावलेले फलक जप्त करण्याती कारवाई प्रशासनामार्फत होईल. 

- डॉ अरुण जऱ्हाड, उपविभागीय अधिकारी, वैजापूर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top