तलवाडा घाटात आढळला महिलेचा मृतदेह

0

वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात अनोळखी महीलेचा कुजलेल्या आवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १० रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिलेचे वय अंदाजे ४०ते ४५ असून तिने पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. 



याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिऊर बंगला ते नांदगाव मार्गावरील तलवाडा घाटातील शेत गट क्रमांक २५३ मधील जंगलात रस्त्याच्या पश्चिम दिशेला नाल्यावरील पुलाजवळ एका अनोळखी महीलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनरक्षक सागर मुढे यांनी शिऊर पोलिसांना दिली. 


घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार, सहायक फौजदार तिलोकचंद पवार, आर. आर. जाधव, राहुल थोरात, मुजिफ शेख, गणेश जाधव, आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह हा चार ते पाच दिवसापूर्वींचा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे दूरपर्यंत दुर्गंधी पसरली होती. 


मृतदेह कुजलेला असल्यामुळे फक्त डोक्याची कवटी व दात दिसत होते. त्यामुळे तिची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. घटनास्थळी न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून  शिऊर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top