वैजापूर पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा
कुत्र्याला दगड मारल्याच्या कारणावरुन आई व मुलास दगडाने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील रोटेगाव येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पोलिसांत दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
छबू पांडुरंग थोरात, अर्चना सिद्धार्थ गायकवाड, प्रकाश पांडुरंग थोरात, विजय छबू थोरात, सचिन बाबुराव थोरात, अक्षय कारभारी थोरात (सर्व रा. रोटेगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मंदाताई थोरात यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील फिर्यादी मंदाबाई या व मारहाण करणारे सर्व नातेवाईक असून रोटेगाव येथे शेजारी - शेजारी राहतात. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मंदाबाई यांचा मुलगा योगेश याने त्यांच्याच पाळीव कुत्र्याला दगड मारला.
परंतु हा दगड चुकून छबू थोरात यांच्या कुत्र्याला लागला. त्यामुळे त्या सर्वांनी मंदाबाई व योगेश यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर मंदाबाई या समजावून सांगण्यासाठी गेल्या असता त्यांनी दगडाने मारहाण करुन मंदाबाई यांना जखमी केले तसेच योगेशलाही मारहाण केली. तसेच त्याच्या दुचाकीचे नुकसान केले. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास एस. आर.सोनवणे करीत आहेत.