गॅस कटरचा वापर; कॅमेऱ्यावर मारला स्प्रे
वैजापूर शहरातील म्हसोबा चौकात असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून चोरट्यांनी 16 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना 17 जानेवारी रोजी पहाटेचा सुमारास घडली. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील म्हसोबा चौकात आयडीबीआय बँकेची शाखा आहे. बँकेत संजीवकुमार त्रिनाथ बेहरा ( रा. शासनअंबागाम ता. हिंजीलिकट जि. गंजाम, ओरिसा ह.मु. म्हसोबा चौक) हे या बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. बँकेला लगत एटीएम मशीन देखील आहे. व्यवस्थापक संजीव बेहरा हे 16 जानेवारी रोजी सकाळच्या दहा वाजता दहा वाजता बँकेत हजर झाले.
रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बँक बंद करून त्यांच्यासह अन्य कर्मचारी घरी परतले. दरम्यान लगतच्या गाळ्यात असलेले एटीएम मशीन सुरळीत चालू होते. बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बँकेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या श्रीराम फायनन्सचा सुरक्षारक्षक रवी गावडे याने व्यवस्थापक संजीव बेहरा यांना फोन करून 'तुमच्या बँकेत काहीतरी तोडफोडचा आवाज येत आहे, तुम्ही तात्काळ बँकेत या' असे सांगितल्यानंतर बेहरा यांच्यासह बँकेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी बँकेकडे धाव घेतली.
चोरट्यांनी आयडीबीआय बँकेचे एटीएम मशिन गॅस कटरचे साह्याने कापून तिजोरीसह 16 लाख रुपये चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरी करताना चोरट्यांनी एटीएममध्ये असलेल्या कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला व बँकेतील वीज पुरवठा खंडीत करून सदर चोरी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भामटे कारमध्ये आले
दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील श्वानपथकासह अंगुलीतज्ञांनी घटनास्थळी येऊन चोरट्यांचा मागमूस घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या फारसे काही हाती लागले नाही. चार भामटे हे क्रेटा कारमधून आले होते. एकाचवेळी चोरट्यांनी एवढी मोठी रक्कम लंपास केली. त्यामुळे या घटनेचा तपास लावणे स्थानिक पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
शहर सुरक्षित आहे का.?
दरम्यान चोरट्यांनी क्लृप्ती लढवून अतिशय शिताफीने हा डल्ला मारला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून अगोदर स्प्रे मारून नंतर वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर गॅस कटरने एटीएम मशिन फोडले. विशेष म्हणजे नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी चौकात ही शाखा आहे. पोलिस ठाणेही येथूनच जवळ आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर अशी घटना घडत असेल तर शहर खरंच सुरक्षित आहे का? असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अलिकडच्या काळात चोरीची ही सर्वात मोठी घटना आहे. या घटनेमुळे वैजापूरकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.