तो फक्त पहिली उत्तीर्ण.!
विजय गायकवाड | सत्यार्थी
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सध्या राज्यात मराठा समाज आरक्षण सर्वे सुरू आहे. परंतु पहिल्याच दिवशी अॅप हँग झाल्याने सर्वेक्षणाला 'खो' बसला आहे. त्यातच सर्वे करणाऱ्या एका 'थम्सअप' ( अंगठेबहाद्दर ) कर्मचाऱ्याची चित्रफित सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. 'माझी शैक्षणिक पात्रता नसल्याने हे काम माझ्या आवाक्याबाहेर असल्याची जाहीर कबुली त्याने दिली आहे'. शासनाने सर्वेक्षणासाठी अशी 'खोगीरभरती' करून 'मोरीवरचे दोरीवर' करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण कसे मिळणार? असे संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाने २३ जानेवारीपासून अॅपच्या माध्यमातून प्रगणकांमार्फत राज्यातील मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. परंतु अॅपच्या अडथळ्यांमुळे या सर्वेक्षणाच्या कामाला पहिल्याच दिवशी 'खो' बसला आहे. प्रशासनाने संबधित अॅप हे इंटरनेटविना चालणार असल्याचा दावा केला होता. त्यांचा तो दावाही फोल ठरला आहे. त्यातच आता सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनोज कांबळे नावाच्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एका नागरिकांने या कर्मचाऱ्यावर प्रश्नांची सरबत्ती करून चांगलीच पोलखोल केल्याने तो निरुत्तर झाला अन् त्याने जाहीर कबुली दिली.
दरम्यान मराठा आरक्षणासारख्या गंभीर विषयावर सर्वेक्षणासाठी प्रशासनातील अधिकारी अशी खोगीरभरती करून मोरीवरचे दोरीवर करीत असेल तर हा विषय गंभीर आहे. हा सर्वे पूर्ण मोबाईलवर करायचा आहे. त्यातच त्याच्याकडे शिक्षण नाही. नाही म्हणायला तो पहिली उत्तीर्ण आहे. त्या कर्मचाऱ्याला मोबाईल हाताळता येत नसल्याची कबुली तो देतोय. १८२ प्रश्नावली भरण्याचे ज्ञान त्याच्याकडे नाही. त्यामुळे तो सर्वेक्षण कसे करणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचा दावा करीत असले तरी या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी हे खरोखरच योग्य आहे किंवा नाही. हे तपासणे गरजेचे आहे.
मुळातच त्याची शैक्षणिक पात्रता, आवाका व कुवत ओळखून हे काम सोपविले पाहिजे. परंतु कोणतीही शहानिशा न करता 'अंगठेबहाद्दर' कर्मचारी नियुक्त करून अधिकारी कातडीबचाव धोरण स्वीकारत आहे. तसे बघायला गेल्यास त्या कर्मचाऱ्याचीही यात चूक आहे. असे म्हणता येणार नाही. माझ्याकडे शिक्षण नाही. मला मोबाईल हाताळता येत नाही. त्यामुळे मला हे काम जमणार नसल्याचे मी अधिकाऱ्यांना सांगितले होते. तसे तो व्हिडीओत सांगताना दिसतोय. असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर हा कामाचा भार कशासाठी टाकला असेल? हे एक न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल. या व्हिडिओवर समाज माध्यमांवर नागरिकांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
कर्मचारी उवाच !
माझी शैक्षणिक पात्रता नसल्याने मला या सर्वेमधील काहीच कळत नाही. मी केडगाव पालिकेत इलेक्ट्रीक मदतनीस म्हणून काम करतो. मला जास्त कळत नाही. शिक्षण नसल्याने मी जोडीदार सोबत घेऊन काम करीत आहेत. मी याबाबत ट्रेनिंग घेऊनही मला उमगत नाही. मला मोबाईल हाताळता येत नाही. असे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांनी हे काम माझ्या माथी मारले'. असे तो व्हिडिओत सांगताना दिसतो. यावर त्या प्रश्नकर्त्याने त्याला विचारलेल्या 'तुम्हाला यातले काहीच येत नाहीतर तुम्ही सर्वे कसा करणार आणि मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार? या प्रश्नांवर तो कर्मचारी मात्र निरुत्तर झाला.
मराठा समाज सर्वेक्षणासाठी असे कर्मचारी नियुक्त केले असतील तर ही गंभीर बाब आहे. अधिकाऱ्यांनी प्रशिक्षित व शैक्षणिक पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांवर हे काम सोपवून जबाबदरीने करून घेतले पाहिजे. चालढकलपणा करून काम फक्त उरकायचे म्हणून उरकावू नका.
- डाॅ. दिनेश परदेशी, भाजप नेते, वैजापूर