प्रगणकांसाठी अडथळ्यांची शर्यत
मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी २३ जानेवारीपासून प्रशासनाने सुरवात केली खरी. परंतु अॅपच्या अडथळ्यामुळे या सर्वेक्षणाच्या कामाला पहिल्याच दिवशी 'खो' बसला आहे. प्रशासनाने संबधित अॅप हे इंटरनेटविना चालणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ही सर्वेक्षण मोहीम अडचणीत सापडली आहे. त्यामुळे येत्या सहा दिवसांत खरंच सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
गेल्या चार महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा वणवा पेटला आहे. मोर्चे, आंदोलनामुळे राजकीय व सामाजिक परिस्थिती ढवळून निघाले असून राजकारण चांगलेच पेटले आहे. दरम्यानच्या काळात शासनाने कुणबी समाजाच्या निजामकालीन नोंदी शोधण्याचे फर्मान महसूल अधिकाऱ्यांना सोडल्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरच शासनाने आता मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रगणकांमार्फत तालुक्यात समाजाचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
२३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत ४०२ प्रगणक व २९ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून वैजापूर शहरासह तालुक्यात हे सर्वेक्षण करण्यात येणार असून यात मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील समाज घटकांचेही ( ब्राह्मण, जैन, राजपूत मुस्लिम, शिख आदी) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कृषि सहायकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान २३ जानेवारीपासून घरोघरी जाऊन पर्यवेक्षकांनी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले खरे. परंतु गोखले इन्स्टिट्युट या खासगी संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपद्वारे सुरू असलेल्या या सर्वेक्षणाला मात्र 'खो' बसत आहे.
प्रगणकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्यात आले असून मोबाईल अॅप पहिल्याच दिवशी बंद पडल्याने प्रगणकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. पहिल्या दिवशी एकाही कुटुंबाचे सर्वेक्षण झाले नाही. यंत्रणा ठप्प झाल्यामुळे सर्वांचाच नाईलाज झाला आहे. ३१ जानेवारीपर्यंत मराठा सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना असताना दुसरीकडे असे अडथळे येत राहिल्यास खरंच हे काम पूर्ण होईल का? नाही झाल्यास शासन यासाठी कालावधी वाढवून देणार का? हे प्रश्न मात्र सध्या अनुत्तरीत आहे.
आतापर्यंत फक्त २० कुंटुबांचा सर्वे
पहिल्या दिवशी अॅप बंद पडल्याने सर्वेक्षण करता आलेच नाही. असा दुजोरा महसूल अधिकाऱ्यांनी दिला आहे. २४ जानेवारी सर्वेक्षणाला सुरवात करण्यात आली. या दिवशी साधारणतः २० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
एका कुटुंबासाठी ३० मिनिटे
एका कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रगणकांना साधारणतः ३० ते ४० मिनिटे लागतात. यामधे १५० पेक्षा जास्त प्रश्नावली आॅनलाईन भरावयाची आहे. प्रशासनाने इंटरनेटविना अॅप चालेल. असा दावा केला होता. त्यांचा हा दावा पहिल्याच दिवशी फोल ठरला आहे. शिल्लक असलेला कालावधी व अॅपच्या अडथळ्यांची शर्यत पाहता खरंच मराठा सर्वेक्षण वेळेत पूर्ण होईल का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
मराठा समाज सर्वेक्षणासाठी अॅप बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. हे मला माहीत झाले. परंतु एक - दोन दिवसांत सुधारणा करून ही मोहीम सुरू राहील.
- सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर
0 Comments