चोरवाघलगाव येथील दुर्देवी घटना
शेततळ्यातील घाण साफ करतांना पाय घसरून पडल्याने १६ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील चोरवाघलगाव शिवारात सोमवारी सायंकाळी घडली आहे. शिवा सोमनाथ भवर (वय १६ वर्ष, रा. चोरवाघलगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनाथ भवर हे कुटुंबासह शेतवस्तीवर राहतात. त्यांनी आपल्या शेतात शेततळे केले आहे. सोमवारी सायंकाळी शिवा हा तळ्यातील घाण साफ करण्यासाठी गेला होता. त्यावेळी शेवाळावर पाय घसरून तो तळ्यात पडून पाण्यात बुडाला. हा प्रकार समजताच परिसरातील ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेत शोधकार्य सुरु केले.
या घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिसांनीही तिकडे धाव घेतली. त्यांनी पोहणा-यांना तळ्यात उतरवून शिवाचा शोध घेत त्याला बाहेर काढले. त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी वीरगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.