दीड लाखांचे साहित्य लंपास
बंद खोलीचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख ४१ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना २५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास वैजापूर शहरातील मुरारी पार्क परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल राजाभाऊ बसवेकर (व्यवसाय नोकरी) हे शहरातील मुरारीपार्क परिसरात रहिवासास आहेत. या ठिकाणी त्यांचे दोन मजली घर असून तळमजल्यात त्यांनी नोकरीच्या अनुषंगाने कामकाज करण्यासाठी लॅपटॉप व अन्य साहित्य ठेवले होते. नेहमीप्रमाणे बुधवारी त्यांनी लॅपटॉपवर कामकाज केले व रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास खोलीला कुलूप लावून ते वरच्या मजल्यावर झोपायला गेले.
गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचे वडील तळमजल्याकडे आले. कुणीतरी खोलीचा कडीकोयंड तोडून कुलूप फेकून दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेचच राहुलला आवाज देऊन बोलावून घेतले. त्या दोघांनी आत जाऊन पाहिले असता खोलीत ठेवलेले दोन लॅपटॉप व अन्य असे एकूण एक लाख ४१ हजार ८०० रुपये किंमतीचे साहित्य चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृद्धीवरून सव्वालाखांचे साहित्य चोरले
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत असलेले एक लाख ३५ हजार रुपये किंमतीचे चॅनलिंग फेसिंग (पोल व तार) चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धम्मराज भास्कर सवई (रा.माळीवेस, सुभाष रोड, बीड) हे ए.बी.एंटरप्राईजेस या कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. ए.बी.एंटरप्राईजेस या कंपनीला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत असलेल्या चॅनलिंग फेसिंग (पोल व तार) बसविण्याचे काम मिळालेले आहे. जून 2023 मध्ये हे काम पूर्ण झाले होते.
दरम्यान धम्मराज हे नेहमी चॅनलिंग फेसिंग व्यवस्थित असल्याबाबत खात्री करण्यासाठी महामार्गावर लक्ष ठेवत. ७ जानेवारी रोजी एक लाख ३५ हजार रुपये किंमतीचे चॅनलिंग फेसिंग चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलेटचोराच्या आवळल्या मुसक्या
वैजापूर शहरातील मारवाडी गल्लीतून बुलेट चोरी करणाऱ्या चोरट्याच्या वैजापूर पोलिसांनी २५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास मुसक्या आवळल्या आहेत.
राहुल कैलास कदम (२८ रा.पढेगाव ता. कोपरगाव) असे या दुचाकीचोराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून मोटारसायकल जप्त केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल किशोर संचेती हे शहरातील मारवाडी गल्लीत राहतात. १० जानेवारी रोजी रात्री त्यांनी त्यांची बुलेट मोटारसायकल (क्रमांक एम. एच. २० ई. डी. २२२५) घरासमोर उभी करून ते नेहमीप्रमाणे जेवण आटोपून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी घराबाहेर येऊन बघितले असता त्यांना मोटरसायकल दिसून आली नाही.
त्यामुळे त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला. परंतु गाडी मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत मोटारसायकल चोरी गेल्याची तक्रार दिली. तपासा दरम्यान घटनेतील चोरटा हा कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील राहुल कदम असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. गुरुवारी रात्री सापळा रचून हवालदार विशाल पडळकर, अविनाश भास्कर व नवनाथ केरे यांनी त्याला शिताफीने मोटारसायकलीसह ताब्यात घेऊन जेरबंद केले.