तहसीलमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न
शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने एका शेतकऱ्याने वैजापूर येथील तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान याप्रकरणी शेतकऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील बाबासाहेब जाधव (४७) रा.शिऊर असे या शेतकऱ्याचे नाव असून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने या शेतकऱ्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील जाधव हे शेतीव्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांची शिऊर येथे शेत गट क्रमांक ३१९ मध्ये शेतजमीन आहे.
दरम्यान शेत गट क्रमांक ३४५ व ३४६ मधील बांधावर निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून खेट्या मारण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप करीत तहसील कार्यालयासमोर त्यांनी २६ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या स्वतःच्या अंगावर डिझेल ओतले व खिशातून काडी पेटी काढली. परंतु पोलिस नाईक किशोर आघाडे, राहुल थोरात या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांच्या हातातून डिझेल कॅन हिसकावून घेतली. त्यानंतर उपचारासाठी सुनील जाधव यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.