Accident | वाळू वाहतुकीचा 'तो' ठरला बळी.! मृतदेह थेट पोलिस ठाण्यात; पोलिसांच्या हप्तेखोरीमुळेच तस्कर बेफाम, नागरिकांचा आरोप

0

 वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार 


भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव ते नालेगाव रस्त्यावरील बाभुळगाव शिवारात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान धडक देणाऱ्या वाहनाला पकडून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी. या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट ठाण्यात नेला.


योगेश आण्णासाहेब गायकवाड (२१ रा. बाभूळगाव बु.) असे या अपघातातील मयत युवकाचे नाव आहे. अपघातग्रस्त वाहन हे वाळूची चोरटी वाहतूक करणारे टिप्पर असून या वाहनावर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी संतप्त नातेवाईक व नागरीकांनी रात्री योगेशचा मृतदेह शिऊर पोलिस ठाण्यात नेला. गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंत हा मृतदेह पोलिस ठाण्यातच होता.पोलिसांनी वाळूच्या वाहनावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर योगेशचा मृतदेह नातेवाईक गावी घेऊन गेले. याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री ९ वाजेच्या सुमारास योगेश हा जेवण करून मोटारसायकलवरून (एम.एच. २०  एक्स १०१२)  जात होता. त्यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्याच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.या अपघातात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर नातेवाईक व गावकऱ्यांनी खासगी वाहनातून योगेशला तातडीने शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषीत केले. अपघात झाल्यानंतर चालक वाहनासह पळून गेला. 


शिऊर पोलिसांकडून 'हप्तेखोरी'

दरम्यान या भागात पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. वाळूची वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने या रस्त्याने रात्रंदिवस धावत असतात. सबंधित बिटच्या कर्मचाऱ्यांचे या वाळूतस्करांशी 'अर्थ'पूर्ण संबंध असल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. पोलिस कर्मचारी तस्करांकडून थेट हप्तेवसूली  करीत असल्याचा आरोपही यावेळी नागरीकांनी केला. 


मृतदेह नेला थेट ठाण्यात 

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या युवकाचा  बळी गेला आहे. त्यामुळे या वाहनावर त्वरीत कारवाई करावी. या मागणीसाठी योगेशचा मृतदेह नातेवाईक व गावकऱ्यांनी थेट पोलिस ठाण्यात नेला होता. पोलिसांवर देखील गुन्हा दाखल करावा.अशी मागणी नागरिकांनी केली. शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत योगेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच बाभुळगाव येथे ३ वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी भगवान रामकिसन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास फौजदार चेतन ओगले  करीत आहेत.


वाळूचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर 

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील लाडगाव येथे वाळूच्या वाहनाने शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना घडली होती. त्यामुळे तालुक्यातील अवैध वाळूची वाहतूक पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top
{\rtf1\ansi\ansicpg1252\deff0\nouicompat\deflang1033{\fonttbl{\f0\fnil\fcharset0 Calibri;}} {\*\generator Riched20 10.0.22621}\viewkind4\uc1 \pard\sa200\sl276\slmult1\f0\fs22\lang9 \par }