पदाधिकाऱ्यांची पाचावर धारण
रात्रीची वेळ.. पोलिसांच्या वाहनाचे वाजणारे सायरन.. सायरन वाजताच चिनभिन होणाऱ्या नजरा.. आणि तेवढ्याच भीतीने ग्रासलेले चेहरे. ही परिस्थिती आहे वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातील. लाचखोरी प्रकरणात उपसरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने गाव प्रकाशझोतात आले अन् एसीबीच्या पथकाने गावात वाऱ्या सुरू करून पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. परिणामी ग्रामपंचायत कार्यालयात (khandala Grampanchayat office) कुणीही पदाधिकारी फिरकायला तयार नाही.
पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या तालुक्यातील खंडाळा येथील उपसरपंच रमेश बागुल, ग्रामपंचायत सदस्य मोबीन पठाण व साजिद खान या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारणतः तीन दिवसांपूर्वी हे प्रकरण घडल्यानंतर खंडाळा ग्रामपंचायत अचानक प्रकाशझोतात आली. तसं बघायला गेल्यास ही ग्रामपंचायत या ना त्या कारणाने कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या सरपंच अपात्र झाल्या होत्या. हा अपात्रतेचा विषयही चांगलाच गाजला होता.
दरम्यान पेट्रोलपंपासाठी नाहरकत प्रमाणपत्रासाठी तीन लाख रुपयांचा 'सौदा' करण्यात आला. रेकाॅर्डिंगच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Curpruption Department ) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आणखी काही 'मासे' गळाला लागण्याची शक्यता असल्याने एसीबीच्या पथकाने खंडाळा वाऱ्या वाढून पदाधिकाऱ्यांची 'झाडाझडती' सुरू केली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पथकाने सदस्यांना गाठून चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पथकाचे वाहन गावात जाऊन कधीही 'सलामी' देत असल्याने पदाधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. परिणामी उगाच आफत नको म्हणून पदाधिकारी ग्रामपंचायतीकडे फिरकायला तयार नाही. पदाधिकारी फिरकत नाही म्हणून अभ्यगंतानीही पाठ फिरवली आहे. एसीबीच्या पथकाच्या रडारवर अख्खे पदाधिकारीच असल्यामुळे या चक्रव्यूहात कोण - कोण अडकणार? हा मात्र औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
नेमकी कुठे शिजली खिचडी?
ऐकिव चर्चेनुसार, या प्रकरणाची खिचडी खंडाळा येथील एका कृषी महाविद्यालयासमोर असलेल्या एका ढाब्यावर 'शिजली'. यावेळी पेट्रोलपंपातील एक भागिदार व अन्य तीन ग्रामपंचायत पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या चर्चेत 'आम्ही नाहरकत प्रमाणपत्रासाठी खदान चालकांकडून १० - १० लाख रुपये घेतो. तुमचे तीन लाख कुठे गेले'? असेही पदाधिकाऱ्यांनी भागिदारास ठणकावून सांगितले. त्यानंतर हा सौदा फिस्कटला. परंतु खिचडी 'शिजविणारे' पदाधिकारी नामानिराळे सुटले अन् दुसऱ्यांच्याच गळ्याला 'फास' लागला.
खरा सूत्रधार कोण?
एसीबीच्या पथकाने उपसरपंचासह अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांविरुध्द गुन्हा दाखल केला खरा. परंतु पोलिसांनी ढाब्यावर पहिल्या बैठकीत 'खिचडी' शिजविणाऱ्या 'त्या' तीन पदाधिकाऱ्यांनाही छत्रपती संभाजीनगर येथे चौकशीसाठी गुरुवारी बोलावले होते. असे समजते. या तीनमधील खरा सूत्रधार आहे. अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे एसीबीच्या पथकाच्या गळाला कोणकोणते 'मासे' लागतात? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
खदान नव्हे खात्या 'गव्हाणी'
दरम्यान तालुक्यातील खंडाळा हे खदानीचे गाव म्हणून ओळखले जाते. या माध्यमातून ग्रामपंचायतीसह महसूल विभागाला मोठा कर मिळतो. या गावालगत जवळपास १२ ते १३ खदानी आहेत. केवळ शासनालाच नव्हे तर या ना त्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर 'मलिदा' मिळतो. खदान म्हणजे सर्वांसाठी खात्या 'गव्हाणी' बनल्या आहेत.