खासदार संदीपान भुमरेंचे आवाहन
वैजापूर तालुक्यातील शेतकरी गेल्या २५ वर्षांपासून साखर कारखान्यापासून वंचित होते. हक्काचा कारखाना नसल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने शेतकऱ्यांची कोंडी करीत होते. परंतु आता खूप अल्प कालावधीत पंचगंगा साखर कारखान्याची ( panchganga sugar factory) उभारणी करून शेतकऱ्यांसाठी उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता हक्काचा कारखाना मिळाला आहे. कारखाना उभारणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हातभार लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कारखाना म्हणून उस घातला पाहिजे. असे आवाहन जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांनी केले
वैजापूर तालुक्यातील महालगाव शिवारातील पंचगंगा साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ उसाची मुळी टाकून झाला. यावेळी भुमरे बोलत होते. आमदार रमेश बोरनारे, नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अण्णासाहेब माने, किसान गडाख, पंचगंगा कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे, सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज, देवगडचे भास्करगिरी महाराज, प्रकाशनंदगिरी महाराज, मधुकर महाराज, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, साबेरखान, संजय निकम, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, अमोल बोरनारे, डॉ. राजीव डोंगरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भुमरे म्हणाले की, महालगाव शिवारात हक्काचा साखर कारखाना सुरू झाला. ही खूप आनंदाची बाब म्हणावी लागेल. हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे. कारखाना उभारणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचाही मोठा हातभार लागला. या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. मी देशाच्या सहकार समितीवर असून भविष्यात काही अडचणी आल्यास मी नि:संकोच सोडविण्यासाठी तत्पर राहिल. अशी ग्वाही देऊन शेतकऱ्यांनी आपला कारखाना म्हणून उस घातला पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले.
कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या कारखान्याच्या माध्यमातून १० विविध उपपदार्थांची निर्मिती होणार असून येत्या आठवड्यात तुम्हाला साखर निर्मिती झालेली दिसेल. हे सर्व पदार्थ साधारणतः वर्षभरात बाजारात पहायला मिळेल. मका खरेदीसह इथेनॉल निर्मिती फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू होईल. या प्रकल्प उभारणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यासह सर्वांचीच मदत झाली. परंतु आमदार रमेश बोरनारेंचा सिंहांचा वाटा राहिला आहे. असे ते म्हणाले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते विधीवत पूजन करून उसाची मुळी टाकून गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी योगेश शिंदे, तेजस शिंदे, कुंडलिक माने, नारायण कवडे, सुलभा भोपळे, पारस घाटे, राजेंद्र साळुंके आदींसह नागरिक, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाळप क्षमता ६५०० टन - आ. बोरनारे
आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे तालुक्यात दुसऱ्या साखर कारखान्याची उभारणी व्हावी. हे माझं स्वप्न होतं. पंचगंगा सीडचे सर्वेसर्वा प्रभाकर शिंदे यांनी माझ्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला अन् ते स्वप्न सत्यात उतरले. कारखाना उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारांनीही येणाऱ्या अडचणींवर मात करीत हिरवा कंदील दाखविला अन् म्हणता म्हणता अवघ्या दोन वर्षांत कारखान्याची उभारणी झाली. कारखाना उभारणीनंतरही कोणतीही अडचण भासू देणार नाही. अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याशिवाय तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे व खासदार संदीपान भुमरेंचेही यासाठी मोठे सहकार्य लाभले. या कारखान्याची गाळप क्षमता ६५०० मेट्रिक टन असून ५ लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय ३२.५ मेगावॅट वीज तयार होऊन मतदारसंघातील वैजापूरसह गंगापूर तालुक्यांसाठी ती वापरात आणली जाणार आहे. कारखान्याच्यावतीने मका खरेदी करून यापासून १ लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. तसेच खतनिर्मिती करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. विशेषतः तालुक्यासह अन्य शेजारच्या तालुक्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.
मी खंबीरपणे पाठीशी उभा
या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांची मोठी फौज येणार होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिंदेचा दौरा अचानक रद्द झाला. परंतु असे असले तरी त्यांनी संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळात काही अडचणी आल्यास मी खंबीरपणे पाठीशी उभा आहे. असे त्यांनी कळविले.