प्रशासनाला आत्मपरीक्षणाची गरज
वैजापूर तालुक्यात वाळूमाफियांनी उच्छाद मांडला असून गेल्या १७ मेपासून वाळूवरून मोठा 'राडा' सुरू आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी वाहने पकडण्यापासून ते श्रीरामपूर पोलिसांशी माफियांची झालेली बाचाबाची, पुरणगाव येथे ठेकेदारासह मजुरांवर झालेला खूनी हल्ला व त्यानंतर ग्रामस्थांनी ठेकेदाराची केलेली पोलखोल पाहता या बाबी महसूल प्रशासनाला आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या आहेत. माफियांची पोलिसांच्या हातून ट्रॅक्टर हिसकाविण्यापर्यंत मजल का गेली? ठेकेदारावर खूनी हल्ला का होतो? अन् गावकरी आक्रमक का होतात? याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता हाताबाहेर गेली असून स्थानिक अधिकाऱ्यांच्याभोवती वाळूमाफियांचाच 'गराडा' असतो. हेही वारंवार समोर आले आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी १७ मे रोजी भल्या पहाटेच वैजापूर येथे येऊन गोदापात्रात गाठत वाळूची तीन वाहने पकडली. २० मे रोजी रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर येथील पोलिसांचे पथक तालुक्यातील नागमठाण येथील गोदापात्रात वाहन पकडण्यासाठी गेले असता माफियांनी त्यांच्याशी बाचाबाची करून पकडलेले ट्रॅक्टर हिसकावून धूम ठोकली. २१ मे रोजी तालुक्यातील पुरणगाव येथील गोदापात्रातील वाळू डेपोवर ठेकेदारावर चाकूने प्राणघातक हल्ला करून तेथील काम करणाऱ्या मजुरांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्या दुसर्याच दिवशी ग्रामस्थांनी एकत्र येत पुरणगाव गोदापात्रात ठिय्या आंदोलन करून ठेकेदाराची मखलाशी चव्हाट्यावर आणली. तहसीलदार सुनील सांवत यांच्यासमक्ष ठेकेदाराच्या पात्रातील 'प्रतापा'चे पितळ उघडे पाडले. एकंदरीत हा घटनाक्रम पाहता गोदापात्रात काय 'धागंडधिंगा' सुरू आहे. हे लक्षात येते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना येथे येऊन कारवाई करावी लागते. म्हणजेच स्थानिक महसूल यंत्रणा किती अकार्यक्षम व भ्रष्ट आहे. हे अधोरेखित होते. यानिमित्ताने यंत्रणेचे अक्षरशः धिंडवडे निघाले. श्रीरामपूर पोलिसांशी जो प्रकार झाला. त्याचे नक्कीच समर्थन करता येणार नाही. माफियांची अरेरावी करून ट्रॅक्टर हिसकाविण्यापर्यंत मजल जाते म्हणजे माफियांच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल. दुसरीकडे स्थानिक पोलिस पाटील माफियांच्या दावणीला असल्याचे यानिमित्ताने समोर आले. स्थानिक यंत्रणेच्या 'हप्तेखोरी'मुळे माफिया कुणाला मोजायला तयार नाही. वेळीच मुसक्या आवळल्या गेल्या असत्या तर त्यांची इथपर्यंत मजल गेली नसती.
अधिकाऱ्यांना वेळेवर 'रसद' पुरविली जात असल्यामुळे गोदापात्र मालकीहक्काचे समजून माफिया उपसा करतात. जेव्हा 'रसद' पुरवूनही विरोध होतो. तेव्हा प्रकरण हमरीतुमरीवर येते. परिणामी अशा घटना घडतात. पुरणगाव येथील घटनेला वेगवेगळे कंगोरे आहेत. येथे 'टाळी' दोन्हीही हाताने वाजली. परंतु असे असले तरी खूनी हल्ल्याचे समर्थन करता येणार नाही. वाळू भरू देण्यास विरोध केला म्हणून गावकऱ्यांनी हल्ला केल्याचे तर ठेकेदार नियमबाह्य उपसा करीत असताना विरोध केला म्हणून खोटा गुन्हा दाखल केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एकंदरीत ही प्रकरणे पाहता नेमके दोषी आणि जबाबदार कोण? असा प्रश्न नक्कीच पडतो. परंतु म्हणतात ना 'साद' घातल्याशिवाय 'प्रतिसाद' मिळत नाही. माफियांनी साद घातल्यानंतर यंत्रणेकडून प्रतिसाद मिळतोच. नंतर 'रसद' पुरविणे बंद झाले की, अधिकाऱ्यांचे 'पित्त' खवळते अन् मग कारवाया सुरू होतात. यातूनच अशी प्रकरणे उद्भवतात. सकृतदर्शनी माफिया जितके दोषी वाटतात तितकीच जबाबदार यंत्रणाही असते.
परंतु यंत्रणेतील अधिकारी 'पाॅवर'मुळे कातडीबचाव धोरण घेऊन नामानिराळे होतात. त्यामुळे समर्थन कुणाचे करायचे अन् बाजू कुणाची घ्यायची? हा मोठा गहन प्रश्न आहे. महसूल यंत्रणा जितकी 'खादाड' तितकीच किंबहुना त्यापेक्षा पोलिस यंत्रणा आहे. कारवाई करणारी यंत्रणाच भ्रष्ट आणि 'भुकेली' असेल तर आनंदी आनंद आहे. ज्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. त्या 'व्यवस्थेतील' अधिकारी 'विकले' जात असतील सर्वसामान्यांनी अपेक्षा करायची कुणाकडून? हाच प्रश्न आहे. याशिवाय गोदाकाठच्या गावांतील 'अप्पा'मंडळीही माफियांच्या दावणीला बांधलेली आहे. 'टाॅप टू बाॅटम' यंत्रणा 'बरबटलेली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास या चोऱ्याचपाट्या अशाच सुरू राहील अन् सामान्य अशाच बोंबा ठोकून एक दिवस शांत होतील. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शासनाचा महसुलाला चुना लागून माफिया आणि अधिकारीच 'गब्बर' होतील. एवढे मात्र नक्की!
वाहनांचीही 'हेराफेरी'
पुरणगाव येथील प्रकरणात ग्रामस्थांनी ठेकेदाराची पोलखोल करून मखलाशी चव्हाट्यावर तर आणलीच. परंतु यापूर्वीही ठेकेदाराने वाहनांची 'हेराफेरी' करून शासनाला चुना लावला. त्यामुळे दरम्यानच्या काळात ग्रामस्थांनी हा ठेका बंद पाडला होता. ठेकेदाराच्या या 'हेराफेरी'ला स्थानिक यंत्रणेची अलिखित परवानगी असल्याने ठेकेदारासह सर्वांचीच 'धूम' सुरू आहे. 'धुतल्या' तांदळाचे कुणीच नाही. त्यामुळेच सर्व काही' सुरळीतपणे' सुरू आहे.