अफलातून शोध, शिक्षणाच्या आयचा घो
विजय गायकवाड | सत्यार्थी
'महाराष्ट्रात तुरी जास्त झाल्या होत्या म्हणून तुरी पाठविण्यात आल्या. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना निरोप पाठविला की, मला तुरी लागतात. औरंगजेबाला डाळीचे वरण आवडायचे म्हणून महाराजांनी तुरी पाठविल्या' अशी गंमतशीर उत्तरे देणारी चित्रफित सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल (प्रसारित) होत आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना 'कुणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या? असा प्रश्न विचारते तेव्हा मात्र विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरं ही धक्कादायक व चक्रावून सोडणारी आहे. व्हिडिओ बघून थोडावेळ विनोद, हास्य व गंमत वाटत असली तरी ही बाब समाजव्यवस्थेला विचार करायला लावणारी आहे. एकंदरीत हा व्हिडीओ बघून 'शिक्षणाच्या आयचा घो' म्हटल्याशिवाय राहवत नाही.
मुले ही देशाचे भविष्य. असं म्हणतात ! एका शिक्षिकेने विचारलेल्या 'कुणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या?' या प्रश्नाच्या उत्तरात मुलांची उत्तरे ऐकून थक्क व्हायला होतं. औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या हातावर, कुणी शिवाजी महाराजांनी आदिलशाह, आदिलशाहने अफजखानाच्या हातावर तुरी दिल्याचे सांगितले. त्यापुढे तर कहरच झाला. काहींनी औरंगजेबाला वरण आवडायचे म्हणून शिवाजी महाराजांनी तुरी दिल्या. औरंगजेबाने महाराजांना निरोप पाठविला की, मला तुरी लागतात. औरंगजेबाकडे जास्त झाल्या म्हणून त्यांनी महाराजांना दिल्या. शिक्षिकेने थोडा 'पाॅज' घेऊन का दिल्या होत्या? या प्रश्नाच्या उत्तरात मुलांनी 'त्यावेळी महाराष्ट्रात तुरी जास्त झाल्या होत्या'. अशी एक - एक अफलातून उत्तरे दिली.
काहींनी मुरारबाजी, दिलेखानने तुरी दिल्याची उत्तरे दिली. ही चित्रफित बघितल्यावर ती ग्रामीण भागातील असावी. असा अंदाज आहे. मुलांच्या बोलण्यावरून ते मराठी माध्यमात शिक्षण घेताहेत. एवढेच मात्र अधोरेखित होते. परंतु चित्रफित नेमकी कुठली आहे? याचा उलगडा होत नाही. शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना काय शिकवू पाहते? या पध्दतीला नेमकं जबाबदार कोण? मुले, पालक, व्यवस्था की गुरूजी? याचा शोध घेण्याची वेळ आली असून शिक्षणधुरीणींनीही मंथन करण्याची गरज आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भारत खरंच महासत्ता बनेल का? संशोधनाचे कसे होईल? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. एकीकडे संगणक युग, देशात बुलेट-ट्रेनच्या गप्पा होत असताना ही खालावलेली शिक्षण पध्दती सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.
संदर्भहीन प्रश्न
संबंधित शिक्षिकेने विद्यार्थ्यांना जो प्रश्न विचारला तो मुळातच संदर्भहीन आहे. थेट 'कुणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या' असे विचारण्यात आले. या प्रश्नाला पाश्र्वभूमी व संदर्भ देण्यात आला नाही. अर्धवट संदर्भहीन प्रश्नाने त्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे 'अर्धवट' शिक्षिका आहे की विद्यार्थी? हाही संशोधनाचा विषय आहे. कदाचित शिवाजी महाराजांनी कुणाच्या हातावर तुरी दिल्या? यावर विद्यार्थी बोलू शकले असते. परंतु हा जर - तरचा विषय आहे. विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना किमान 'तुरी' तरी माहीत होत्या. हेही नसे थोडके!
काय आहे अभिप्रेत
मुळात विद्यार्थ्यांना विचारला गेलेला प्रश्न इतिहासातील एक प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यात औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. तेव्हा महाराज चलाखीने त्याच्या नजरकैदेतून गुंगारा देऊन निसटले. तेव्हापासून इतिहासात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्याचा वाक्प्रचार प्रचलित झाला. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. असे विद्यार्थ्यांकडून अभिप्रेत होते. परंतु विद्यार्थ्यांच्या उत्तरांनी पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहत नाही.